एनडीए रस्त्यावरील कोंढवा धावडे येथील हॉटेल पिकॉक गार्डन अॅन्ड रेस्टॉरंटमधील घटना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : “दारू पिऊन कामावर येऊ नको,” असे सांगितल्याच्या रागातून वेटरने चाकूने वार करून हॉटेल मालकाचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना एनडीए रस्त्यावरील पिकॉक गार्डन अॅन्ड रेस्टॉरंटमध्ये बुधवारी रात्री घडली.
संतोष सुंदर शेट्टी (वय ४५) असे खून झालेल्या हॉटेल मालकाचे नाव आहे. उत्तमनगर पोलिसांनी रेस्टॉरंटच्या भटारखान्यातील कामगार उमेश दिलीप गिरी (वय ३९, रा. पिकॉक गार्डन स्टाफ क्वार्टर्स) याला अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष शेट्टी यांच्या हॉटेलमध्ये उमेश गिरी हा २२ दिवसांपासून कामाला होता. तो तेथील कामगारांच्या क्वार्टर्समध्ये राहत होता. तो दारू पिऊन कामावर आल्याने संतोष शेट्टी यांनी त्याला, “तू दारू पिऊन कामावर येऊ नको.
दारू प्यायची असेल तर कामावर यायचे नाही,” असे सांगितले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला होता. गिरी याने, “माझा पगार द्या, मी येत नाही,” असे सांगितले. त्यावर शेट्टी यांनी, “तुला कामाला लागून २२ दिवस झाले.
त्यात तू अडीच हजार रुपये अगोदरच घेतले आहेत. मग पगार कोठून देऊ?” असे उत्तर दिले. त्यामुळे गिरी रागावला. बुधवारी रात्री शेट्टी हे भटारखान्यात आले असता, गिरीने तेथील मोठा चाकू घेऊन त्यांच्या मानेवर सपासप वार केले.
त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; परंतु त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून गिरी याला अटक केली आहे.
